यूपी'तील राजकीय रणसंग्रामात 'आरपीआय' महत्वाच्या भूमिकेत-डॉ.हुलगेश चलवादी.
विधानसभेतील २० ते २५ जागांवर पक्षाची विशेष मोर्चेबांधणी
पुणे:-
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नुकत्याच झालेल्या वाराणसी दौऱ्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापले आहे. युपी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने राज्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, मा.आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे आमदार उत्तर प्रदेशात निश्चितपणे निवडून येतील. 'यूपी'तील राजकीय रणसंग्रामात 'आरपीआय' महत्वाच्या भूमिकेत असून याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येईल, असा विश्वास पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष,बहुजन नेते डॉ.हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेशात पक्ष बळकट करण्यासाठी 'आरपीआय' पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. पक्षाने राज्यातील २० ते २५ जागांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, २६ नोव्हेंबर रोजी 'संविधान दिना'चे औचित्य साधून लखनऊमध्ये एका ऐतिहासिक महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या माध्यमातून सुमारे १ लाख लोकांना एकत्र आणून पक्षाचे मोठे शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्धार मा.आठवले साहेबांनी बोलून दाखवला असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात दलित, शोषित आणि मागासवर्गीय मतदारांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे. दलित मतांचे विभाजन आणि पारंपारिक पक्षांबद्दल असलेला असंतोष यांमुळे एक मोठी राजकीय पोकळी 'यूपी'त निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नेहमीच वंचित घटकांचा आवाज दिल्लीच्या दरबारात बुलंद केला आहे. त्यामुळे युपीमधील आंबेडकरी आणि बहुजन समाज आता आरपीआयला एक सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून बघतो असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
वाराणसी, पूर्वांचल आणि अवध प्रांतातील विशिष्ट जागांवर दलित आणि मागासवर्गीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या जागांवर आरपीआयने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मा.आठवले साहेबांच्या प्रभावी नेतृत्वामुळे पक्ष यावेळी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत मानाने प्रवेश करीत निळा झेंडा फडकवेल, असा विश्वास डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला.





