नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनपा सज्ज अग्निशमन परवाना नसलेल्या हॉटेल्ससह सर्व आस्थापनांवर कारवाईचे संकेत फायर ऑडिट व तपासणी मोहीम राबविण्याचे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांचे आदेश.
छत्रपती संभाजीनगर:
दिल्लीतील एका हॉटेलमध्ये घडलेल्या भीषण अग्निकांडात २१ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत अग्निशमन परवाना नसलेल्या तसेच आवश्यक अग्निसुरक्षा यंत्रणांचा अभाव असलेल्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी दिले.त्यांनी याबाबत तात्काळ
आज मनपा मुख्यालयात अग्निशमन विभागाची बैठक घेतली. यात त्यांनी शहरातील सर्व हॉटेल्स, खाजगी रुग्णालये, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका, जिम, खासगी शाळा, मॉल्स आणि व्यावसायिक आस्थापनांची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले. ज्या आस्थापनांकडे वैध अग्निशमन परवाना नाही अथवा आवश्यक अग्निसुरक्षा उपकरणे उपलब्ध नाहीत, त्यांना तात्काळ नोटीस बजावून नियमांनुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी सर्व संबंधित आस्थापनांचे फायर ऑडिट करण्यावर भर देत, अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होत आहे की नाही याची खातरजमा करण्याचे निर्देश दिले. “नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणाला माफी दिली जाणार नाही. शहरात दिल्लीसारखी दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासन दक्ष असून आवश्यक ते सर्व उपाय तत्काळ राबविण्यात येतील,” असे सभापती मकरिये यांनी सांगितले.
बैठकीस आरोग्य सभापती डॉ. सुनीता सोळुंके, गृहनिर्माण व समाजकल्याण समिती सभापती जालिंदर शेंडगे, अतिरिक्त आयुक्त (२) कल्पिता पिंपळे, उपआयुक्त तथा अग्निशमन विभाग प्रमुख लाखिचंद चव्हाण, अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर तसेच प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला भामरे उपस्थित होते.
मनपा प्रशासनाच्या या निर्णयामुळे शहरातील सार्वजनिक व व्यावसायिक आस्थापनांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेवर अधिक प्रभावी नियंत्रण येणार असून नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी मिळणार आहे.





