प्रतिबंधात्मक बॉण्ड तोडून पुन्हा तंटा; सावंगीतील इसमावर पोलिसांची कठोर कारवाई

प्रतिबंधात्मक बॉण्ड तोडून पुन्हा तंटा; सावंगीतील इसमावर पोलिसांची कठोर कारवाई

प्रतिबंधात्मक कारवाईचा भंग करून पुन्हा भांडण-तंटा करणाऱ्या इसमाची हर्सूल कारागृहात रवानगी

छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमधील फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावंगी येथे प्रतिबंधात्मक कारवाईचा भंग करून पुन्हा भांडण-तंटा करणाऱ्या 32 वर्षीय इसमाविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली.

सावंगी येथील अन्वर कादर शहा याच्याविरुद्ध यापूर्वी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 129 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीचा बॉण्ड घेण्यात आला होता.

मात्र, 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजता अन्वर शहा याने पुन्हा भांडण-तंटा करून शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच यापूर्वी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईतील बॉण्डच्या अटींचाही भंग केला.

या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सुग्रीव चाटे यांनी BNSS कलम 141 अन्वये पुढील प्रतिबंधात्मक कारवाई केली. भविष्यातही त्याच्याकडून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या आदेशानुसार त्याची हर्सूल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे रवानगी करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, PSI सुग्रीव चाटे, HC राठोड आणि PC गायकवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला.

फुलंब्री पोलिसांनी नागरिकांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. प्रतिबंधात्मक कारवाई झालेल्या व्यक्तींनी त्यांच्यावर घालण्यात आलेल्या अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करावे. पुन्हा भांडण-तंटा अथवा शांतता भंग करणारी कृत्ये केल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

वाद निर्माण झाल्यास नागरिकांनी स्वतः कायदा हातात न घेता तात्काळ डायल 112 वर पोलिसांशी संपर्क साधावा, असे पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी आवाहन केले आहे.