घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 नुसार 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांना स्वतःच प्रक्रिया करणे बंधनकारक

घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 नुसार 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांना स्वतःच प्रक्रिया करणे बंधनकारक

छत्रपती संभाजीनगर शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शाश्वत आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. “Solid Waste Management Rules 2026” च्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील Bulk Waste Generator (BWG) तसेच Event Waste Management यासाठी स्वतंत्र व कडक नियमावली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या नव्या नियमांनुसार, ज्या आस्थापनांकडून दररोज 100 किलो किंवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होतो, अशा सर्व संस्थांना यापुढे स्वतःच त्यांच्या कचऱ्याची प्रक्रिया करणे बंधनकारक राहणार आहे. यामध्ये ओला कचरा, सुका कचरा तसेच इतर प्रकारच्या कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करून त्यावर जागेवरच प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन करण्यासाठी संबंधित संस्थांनी कंपोस्टिंग युनिट, बायोगॅस प्लांट किंवा इतर प्रक्रिया यंत्रणा उभारणे आवश्यक राहील.

तसेच, सर्व Bulk Waste Generator यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) EBWGR पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे कचऱ्याचे उत्पादन, वर्गीकरण आणि प्रक्रिया यावर प्रभावी देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.

महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या हॉटेल्स, विवाह समारंभ स्थळे, फंक्शन हॉल्स, मॉल्स, व्यापारी संकुले, शैक्षणिक संस्था तसेच विविध उद्योग-आस्थापनांना हा नियम लागू होणार आहे. महानगरपालिकेच्या प्राथमिक अंदाजानुसार शहरात सध्या 200 पेक्षा अधिक आस्थापने दररोज 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करतात. या सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Event Waste Management साठीही कडक अट:

यासोबतच शहरात कोणताही सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रम आयोजित करताना कचरा व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. कार्यक्रम आयोजकांना यापुढे महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. कार्यक्रमातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणानुसार शुल्क आकारले जाईल. तसेच कार्यक्रम संपल्यानंतर त्या ठिकाणी कचरा आढळल्यास संबंधित आयोजकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.या निर्णयामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन प्रक्रिया केंद्रांवरील ताण कमी होईल, तसेच स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला मोठा हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“छत्रपती संभाजीनगर शहराला स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याचा आमचा संकल्प आहे. ‘Solid Waste Management Rules 2026’ अंतर्गत घेतलेले हे निर्णय शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांनी जबाबदारी स्वीकारून स्वतःच कचऱ्याची प्रक्रिया करणे ही काळाची गरज आहे. तसेच कोणत्याही कार्यक्रमामध्ये कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी आयोजकांनी प्राधान्याने पार पाडली पाहिजे. नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही. सर्व नागरिक, व्यापारी आणि आस्थापनांनी प्रशासनाला सहकार्य करून ‘स्वच्छ आणि हरित छत्रपती संभाजीनगर’ घडविण्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्त अमोल येडगे यांनी केले"

महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे शहरात स्वच्छतेची नवी दिशा निर्माण होणार असून नागरिक आणि आस्थापनांनी यामध्ये सकारात्मक सहभाग घेणे अत्यंत गरजेचे आहे.