जनगणना हे देशाचे महत्त्वाचे कार्य; सगळ्यांनी सहयोग द्यावा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

जनगणना हे देशाचे महत्त्वाचे कार्य; सगळ्यांनी  सहयोग द्यावा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

देशाची जनगणना सुरु झाली आहे. जनगणनेचे कार्य करण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने जय्यत तयारी केली असून जनगणनेचे प्रत्यक्ष कार्य सुरु झाले आहे. जनगणनेची जिल्ह्यातील तयारी, एकूणच जनगणनेचे महत्त्व, प्रशासन आणि नागरिकांची भुमिका काय असावी याविषयी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सविस्तर माहिती दिली आहे. जनगणना याविषयावर जिल्हाधिकारी गौडा यांची ही मुलाखतः-

प्रश्न १- जनगणना हा उपक्रम भारत सरकार मार्फत राबविला जात आहे. या जनगणनेचे महत्व , त्याची उपयुक्तता याबद्यल आपण काय सांगाल ?

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.- जनगणना हा भारत सरकारचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि व्यापक उपक्रम असून, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी तो आधारभूत मानला जातो. जनगणनेद्वारे लोकसंख्या, स्त्री-पुरुष प्रमाण, साक्षरता, रोजगार, निवास व्यवस्था, सामाजिक व आर्थिक स्थिती यासंबंधी अचूक माहिती संकलित केली जाते. ही माहिती शासनाला विकास आराखडे तयार करण्यासाठी, विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यास उपयुक्त ठरते.

प्रश्न २- जनगणनेमध्ये लोकांनी आपली माहिती त्यांच्या घरी येणाऱ्या प्रगणकाला सांगावी. ती खरी सांगावी असे बंधनकारक आहे का ? ही माहिती गोपनीय असते का ?

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.- होय, नागरिकांनी जनगणने दरम्यान दिलेली माहिती अचूक व सत्य स्वरूपात देणे बंधनकारक आहे. जनगणना कायद्यानुसार नागरिकांकडून प्राप्त होणारी सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. ही माहिती केवळ सांख्यिकी व नियोजनात्मक उद्देशांसाठी वापरली जाते. कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केली जात नाही. तसेच जनगणना अधिकारी व कर्मचारी यांना माहितीची गोपनीयता राखण्याबाबत शपथ दिली जाते.

प्रश्न ३- लोकांनी दिलेल्या या माहितीचा शासन कशाप्रकारे उपयोग करते ?

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.- नागरिकांकडून प्राप्त होणारी माहिती शासनाच्या विविध धोरणात्मक निर्णयांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रोजगार, ग्रामीण व शहरी विकास, महिला व बालकल्याण, सामाजिक सुरक्षा योजना तसेच पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी या माहितीचा वापर केला जातो. याशिवाय लोकसंख्येतील बदल, स्थलांतर, साक्षरता आणि आर्थिक स्थिती यांचा अभ्यास करून शासन विकासाभिमुख धोरणे आखते.

प्रश्न ४- जनगणनेची अंमलबजावणी करतांना प्रशासकीय रचना कशी आहे ?

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.- जनगणनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी जिल्हास्तर व तालुकास्तरावर स्वतंत्र जनगणना कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षांमार्फत विविध अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून, नियोजन, प्रशिक्षण, समन्वय व अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व सुयोग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन स्तरावर आवश्यक ती यंत्रणा कार्यरत आहे.

प्रश्न ५- जनगणनेसाठी जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेने काय तयारी केली आहे ? किती कर्मचारी -अधिकारी नियुक्त केले आहेत ?

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.- जनगणना प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. जिल्ह्यात एकूण १८ चार्ज अधिकारी, ५०९५ प्रगणक, ८२५ सुपरवायझर तसेच ८६ फील्ड ट्रेनर्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून, तांत्रिक व प्रशासकीय समन्वयासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे.

प्रश्न ६- ही जनगणना १६ वी जनगणना असली तरी पहिली डिजीटल जनगणना आहे, त्याचे वेगळेपण काय सांगाल?

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.- भारतातील ही पहिली डिजिटल जनगणना असून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि गतिमान करण्यात आली आहे. नागरिकांना स्वतःच्या मोबाईलद्वारे स्वगणना करता येणार आहे. तसेच प्रगणकांकडूनही माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जाणार असल्याने माहिती संकलन अधिक अचूक व वेगवान होईल. डिजिटल प्रणालीमुळे माहितीचे विश्लेषण व व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

प्रश्न ७- या जनगणनेसाठी कर्मचाऱ्यांना म्हणजेच प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे काय?

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.- होय, जनगणना प्रक्रियेसाठी नियुक्त सर्व प्रगणक, सुपरवायझर आणि क्षेत्रीय अधिकारी यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये डिजिटल प्रणालीचा वापर, माहिती संकलन प्रक्रिया, नागरिकांशी संवाद कौशल्य तसेच माहितीची अचूकता व गोपनीयता राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

प्रश्न ८- प्रगणकांना माहिती देतांना नागरीकांनी काय दक्षता घ्यावी ?

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.- खरी व अचुक माहिती द्यावी,प्रगणकाचे ओळखपत्र तपासावे ,अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रश्न ९- अशाप्रकारची जनगणना सुरु असतांना कुणी बनावट प्रगणक बनून फसवण्याचा प्रकार करत असेल तर नागरिकांनी कशी दक्षता घ्यावी ?

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.- प्रगणकाचे अधिकृत ओळखपत्र तपासावे, संशय आल्यास तालुका स्तरावरील तहसीलदार तथा चार्ज अधिकारी व नगर परिषद /नगर पंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी यांना संपर्क करण्यात यावा.

प्रश्न १०- जनगणनेसंदर्भांत सामान्य नागरीकांना काही प्रश्न/शंका असल्यास त्यांच्या शंका निरसनासाठी त्यांना काही हेल्पलाईन/पोर्टल इत्यादी सुविधा आहेत का ? त्या कोणत्या ?

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.- https://se.census.gov.in, किंवा www.census.gov.in या पोर्टल वरील १८५५ हा हेल्पलाईन नंबर आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील ०२४०-२३३१०७७ या क्रमांकावर नागरीकांना जनगणना बाबत काही अडचणी असल्यास संपर्क करावा.