एचपीव्ही लसीकरणाबाबत आयुक्तांचे निर्देश; पात्र विद्यार्थिनींचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन.
छत्रपती संभाजीनगर:-महानगरपालिकेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत आयुक्त अमोल येडगे यांनी 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही (HPV) लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळविण्यासाठी एचपीव्ही लस प्रभावी ठरत असल्याने पात्र वयोगटातील सर्व विद्यार्थिनींचे लसीकरण करून घेण्याबाबत त्यांनी मुख्याध्यापकांना निर्देश दिले.
यावेळी त्यांनी शाळास्तरावर एचपीव्ही लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. तसेच विद्यार्थिनींच्या पालकांना या लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगून त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
पुढील पंधरा दिवसांत प्रत्येक शाळेतील 14 ते 15 वर्षे वयोगटातील सर्व पात्र विद्यार्थिनींचे नजीकच्या मनपा आरोग्य केंद्रामार्फत एचपीव्ही लसीकरण पूर्ण होईल, यासाठी आवश्यक समन्वय, जनजागृती आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याचे निर्देश आयुक्त येडगे यांनी दिले. पात्र विद्यार्थिनींच्या 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुख्याध्यापकांनी विशेष लक्ष देऊन कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.





