छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकारण कामाचा आयुक्त जी.श्रीकांत यांच्याकडून आढावा.

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकारण कामाचा  आयुक्त जी.श्रीकांत यांच्याकडून आढावा.

छत्रपती संभाजीनगर, दि. 30 : छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सीएसएमआरडीए) अंतर्गत समाविष्ट 313 गावांचा आणि झालर क्षेत्राचा सुनियोजित व सर्वसमावेशक विकास करण्यासाठी प्राधिकरणाच्या पायाभूत सुविधांचा अभ्यास, विश्लेषण, मॅपिंग (जीआयएस) आणि इतर बाबींच्या कामकाजाचा प्राधिकरणाचे आयुक्त तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज आढावा घेतला.

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयातील सभागृहात कामकाज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणाचे महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, महानगर उपायुक्त (प्रशासन) लखीचंद चव्हाण तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आणि नियोजित विकास साध्य करणे हेच प्राधिकरणाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगत त्याअनुषंगाने प्राधिकरण कार्यप्रणाली समजावून सांगण्यासाठी प्राधिकरण क्षेत्रातील सर्व गावातील लोकप्रतिनिधी,जिल्हा परिषद, महसूल आणि संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करावी. तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या कर्तव्य व जबाबदारीची निश्चिती करावी अशी सूचना केली.

त्याचबरोबर एक ऑगस्ट पासून प्राधिकरणाचे कार्यालयीन कामकाज ई ऑफिस प्रणाली द्वारे सुरू झालेच पाहिजे त्याअनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच वेरूळ -घृष्णेश्वर मंदिर परिसरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटदाराची निवड करणे, आपले सरकार पोर्टल वरील तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची निवारण करणे, सात दिवसांपेक्षा अधिक देयके प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेणे, प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत मालमत्ता गुंठेवारीसाठी आलेले प्रस्ताव, मंजूर, नामंजूर आणि प्रलंबित प्रस्तावांची माहिती, याबाबतचा आढावाही आयुक्त जी.श्रीकांत यांनी घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयासाठी किमान दोन एकर शासकीय जागा असण्याबाबत पाठपुरावा करण्याची सूचनाही आयुक्त जी. श्रीकांत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. यावेळी त्यांनी मसीआ, क्रेडाई, सीएसएन फर्स्ट चे प्रतिनिधी, पदाधिकारी यांच्याही समस्या जाणून घेतल्या.