किराडपुरा येथे रेशन धान्य काळाबाजार प्रकरणाचा पर्दाफाश; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा परिसरात गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत रेशन धान्याच्या काळाबाजाराचा मोठा पर्दाफाश झाला. गोपनीय माहितीच्या आधारे हबीबिया मशिदीजवळील एमआर फंक्शन हॉल परिसरातील गोदामावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत रेशन धान्याचा मोठा साठा व वाहन जप्त करण्यात आले असून जिन्सी पोलिस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान लगतच्या खोलीत अंगणवाडीतील ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालके तसेच गर्भवती व स्तनदा मातांसाठी शासनाकडून मोफत पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पॅकेट्समधील अन्नधान्य गोण्यांमध्ये भरून ठेवलेले आढळून आले. याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत समीर बाबर कुरेशी, फहाद लईक शुतरी आणि फरदीन गणी पठाण यांना अटक करण्यात आली असून आवेज कुरेशी, कलीम छोटू कुरेशी व इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. दोन्ही कारवाईत मिळून रेशन धान्य, पोषण आहार व वाहनांसह एकूण 17 लाख 6 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने अटक आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास जिन्सी पोलीस करत आहेत.





