मागील सहा महिन्यांचे रेशन दुकानदारांचे कमिशन तात्काळ जमा करा स्वस्त धान्य दुकानदार महासंघाची प्रशासनाकडे मागणी.
छत्रपती संभाजीनगर :
मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेले रेशन दुकानदारांचे कमिशन (मार्जिन मनी) तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, अशी मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात विभागीय पुरवठा उपआयुक्त, जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच संबंधित तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
महासंघाने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, स्वस्त धान्य दुकानदारांचा संपूर्ण उदरनिर्वाह शासनाकडून मिळणाऱ्या कमिशनवर अवलंबून आहे. याच रकमेतून दुकानाचे वीज बिल, वाहतूक खर्च, मापारी, भाडे तसेच इतर दैनंदिन खर्च भागविले जातात. मात्र मागील सहा महिन्यांपासून कमिशन न मिळाल्यामुळे दुकानदारांना गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्याच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दुकानदारांसाठी हे कमिशन अत्यंत महत्त्वाचे असून शासनाच्या नियमानुसार दर महिन्याला कमिशन जमा होणे अपेक्षित आहे. तथापि, अद्यापही प्रलंबित रक्कम जमा करण्यात आलेली नसल्याने दुकानदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुकानदारांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने मानवतावादी दृष्टीकोनातून विचार करावा आणि मागील सहा महिन्यांचे थकीत कमिशन तातडीने अदा करावे. तसेच यापुढे दर महिन्याचे कमिशन नियमितपणे दुकानदारांच्या खात्यावर जमा करण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश द्यावेत, अशी मागणी महासंघाने केली आहे.
या निवेदनावर छत्रपती संभाजीनगर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गंगाधर पवार, उपाध्यक्ष पुंडलिकराव आंभोरे, सचिव श्रीमंत बोंगाणे, सैय्यद लायकोद्दीन, संजय साळवे, ज्योतीराव जाधव, कैलास पारखे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित कमिशनचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे लक्ष लागले आहे.





