सकाळी उद्घाटन झाले सायंकाळी दहा हजाराचा दंड भरावा लागला. देवळाई चौकात रस्त्यावर कचरा टाकल्याप्रकरणी ‘माधव सोलर एनर्जी’वर ₹ दहा हजारांचा दंड.

सकाळी उद्घाटन झाले सायंकाळी दहा हजाराचा दंड भरावा लागला. देवळाई चौकात रस्त्यावर कचरा टाकल्याप्रकरणी ‘माधव सोलर एनर्जी’वर ₹ दहा हजारांचा दंड.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सातारा देवळाई चौक परिसरातील ‘माधव सोलर एनर्जी’ या नवीन दुकानाचे उद्घाटन रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी पार पडले. यासाठी पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते व त्यांच्या साठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र उद्घाटन कार्यक्रमानंतर चहा-नाश्त्याचा कचरा दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. 

सातारा परिसरातील घनकचरा व्यवस्थापन विभागाची टीम स्वच्छता पाहणी करत असताना त्यांना ह्या दुकानासमोरील कचरा निदर्शनास आला. या प्रकाराची गंभीर दखल घेत मा. उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग श्री. नंदकिशोर भोबे यांच्या आदेशानुसार संबंधित दुकानावर ₹१०,००० इतका दंड आकारण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त श्री. अमोल येडगे सर यांनी सांगितले की स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध शहर विद्रुप करणाऱ्या विरुद्ध सुरू असलेल्या कठोर मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असून वेळप्रसंगी त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी व्यवसायिकांनी ओला, सुका व इतर कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून तो निर्धारित ठिकाणीच दयावा.

तसेच शहरातील नागरिकांनी कोणत्याही सांस्कृतिक, सामाजिक, खासगी, कौटुंबिक किंवा कोणत्याही प्रकारचे उत्सव कार्यक्रम साजरे करत असताना ते सर्व झिरो वेस्ट इव्हेंट राहतील याची काळजी घ्यावी किंवा हे सर्व कार्यक्रम पर्यावरण पूरक असावे. छत्रपती संभाजीनगर शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मनपा आयुक्त यांनी केले.

या कारवाईवेळी स्वच्छता निरीक्षक उमेश खरात, जवान विनोद कदम तसेच नागरिक मित्र पथकाचे गौतम वानखेडे, संतोष नवगिरे आणि रावसाहेब इधाटे उपस्थित होते.