सुखना नदीला मिळणार नवे रूप; पुनरुज्जीवनासाठी सभापती अनिल मकरीये यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत केली प्रत्यक्ष पाहणी.

सुखना नदीला मिळणार नवे रूप; पुनरुज्जीवनासाठी सभापती अनिल मकरीये यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत केली प्रत्यक्ष पाहणी.

छत्रपती संभाजीनगर: शहरातील सुखना नदीला तिचे नैसर्गिक सौंदर्य आणि प्रवाह पुन्हा मिळवून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. या 'सुखना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत' सुरू असलेल्या कामांची सविस्तर पाहणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती श्री. अनिल मकरीये यांनी शुक्रवारी, १५ मे २०२६ रोजी प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नदीपात्राचा दौरा केला. यावेळी त्यांनी केवळ कामाचा आढावाच घेतला नाही, तर नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पात्र स्वच्छ करण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना जागेवरच स्पष्ट आणि कडक आदेश दिले आहेत.

या पाहणी दरम्यान सभापती मकरीये यांनी अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख श्री. संतोष वाहुळे यांना नदीपात्रात असलेली सर्व अतिक्रमणे तात्काळ निष्कासित करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून नदीचा मूळ प्रवाह प्रवाही होण्यास मदत होईल. नदीत मिसळणाऱ्या दूषित पाण्याबाबत गांभीर्य व्यक्त करत त्यांनी ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता आणि वॉर्ड ५ व ६ च्या अभियंत्यांना आदेश दिले की, नदीत प्रवाहित होणारे दुर्गंधीयुक्त पाणी तात्काळ बंद करण्यात यावे. जर नागरिकांकडून किंवा सोसायट्यांकडून सांडपाणी सोडले जात असेल तर त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. विशेषतः औद्योगिक वसाहतींमधून (MIDC) जर रासायनिक किंवा दुर्गंधीयुक्त पाणी नदीत येत असल्याचे आढळले, तर संबंधित उद्योगांवर सील ठोकण्याची कठोर कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

नदीचा परिसर निसर्गरम्य करण्यासाठी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नदीच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे नियोजन मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांनी करावे, असे सभापतींनी सांगितले. त्याचप्रमाणे, नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी उपायुक्त नंदकिशोर भोंबे आणि घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्याप्रसंगी नगरसेविका श्रीमती प्रियंका दीपक खोतकर, श्रीमती अर्चना संजय चौधरी आणि माजी नगरसेवक श्री. संजय चौधरी यांच्यासह झोन ५ व ६ चे सहाय्यक आयुक्त, उप अभियंता आणि महापालिकेचे इतर सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांच्या समन्वयाने सुखना नदी लवकरच पुनरुज्जीवित होऊन शहरासाठी एक नवीन ओळख निर्माण करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी शहर अभियंता संजय कांबळे, अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे, उप आयुक्त नंदकिशोर भोंबे, विजय पाटील, सहाय्यक आयुक्त झोन 5 प्राजक्ता वंजारी, वार्ड अभियंता मधुकर चौधरी आदींची उपस्थिती होती.