NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरण: परीक्षा रद्द, CBI चौकशीचे आदेश; असदुद्दीन ओवैसींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.

NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरण: परीक्षा रद्द, CBI चौकशीचे आदेश; असदुद्दीन ओवैसींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.

हैदराबाद, तेलंगणा: NEET-UG 2026 परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या आरोपांनंतर परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर AIMIM अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले. “ज्या कायद्याला तुम्ही संसदेत मंजुरी दिली, कडक शिक्षेची हमी दिली, कठोर कारवाईचे आश्वासन दिले, त्याचे काय झाले? मग पेपर लीक कसा झाला?” असा सवाल ओवैसी यांनी केला. 

ओवैसी म्हणाले गेल्या एक-दोन वर्षांपासून प्रचंड मेहनत करणाऱ्या, कोचिंग क्लासेससाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या पालकांच्या आणि गरीब विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा विचार करा. जे NEET क्लिअर करण्याचे स्वप्न पाहतात त्यांची अवस्था काय? भाजपने याचे उत्तर दिले पाहिजे. पंतप्रधानांनी याचे उत्तर दिले पाहिजे.”

पेपर लीक प्रकरण: नेमकं काय घडलं?

परीक्षा रद्द व CBI चौकशी

राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) ने 3 मे 2026 रोजी झालेली NEET-UG 2026 परीक्षा रद्द केली आहे. केंद्र सरकारने संपूर्ण प्रकरण CBI कडे सोपवले असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. नवीन परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज किंवा फी भरावी लागणार नाही. 

राजस्थान SOG चा तपास - 135 प्रश्न जुळले

NEET परीक्षा 3 मे रोजी झाल्यानंतर राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ने पेपर लीकच्या दाव्यांची चौकशी सुरू केली. तपासात एक हस्तलिखित 'सजेशन पेपर' सापडला ज्यातील 135 प्रश्न थेट NEET च्या मूळ पेपरशी जुळत होते. यात जीवशास्त्राचे 90 आणि रसायनशास्त्राचे 45 प्रश्न होते. हे 600 गुणांचे प्रश्न होते, तर NEET चा एकूण पेपर 720 गुणांचा असतो.

. पेपर कसा पसरला?

हा हस्तलिखित पेपर 1 मे रोजी, म्हणजे परीक्षेच्या दोन दिवस आधी, राजस्थानच्या सिकरमध्ये फिरू लागला. सूत्रांनुसार, हा पेपर विद्यार्थ्यांना ₹20,000 ते ₹2 लाखांपर्यंत विकला गेला. परीक्षेच्या आदल्या रात्री एका कॉपीची किंमत ₹30,000 पर्यंत पोहोचली होती. तपासात समोर आले की हा पेपर केरळमधून सिकरला आणला गेला, ज्यामुळे आंतरराज्यीय रॅकेटची शक्यता आहे. 

NTA चा दावा व नंतर भूमिका बदल

7 मे रोजी संशयास्पद गैरप्रकारांची माहिती मिळाल्यानंतर NTA ने प्रकरण केंद्रीय यंत्रणांकडे सोपवले होते. सुरुवातीला NTA ने परीक्षा GPS-युक्त वाहनांतून पेपर वाहतूक, AI-आधारित CCTV देखरेख अशा कडक सुरक्षेत झाल्याचे सांगितले होते. मात्र, तपास यंत्रणांच्या अहवालानंतर परीक्षेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

22 लाख विद्यार्थ्यांवर परिणाम 

यावर्षी NEET-UG साठी सुमारे 22.79 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती व 3 मे रोजी परीक्षा दिली होती. आता या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. NTA ने स्पष्ट केले की जुन्या नोंदणी, परीक्षा केंद्राची पसंती ग्राह्य धरली जाईल. 

2024 मध्येही बिहार आणि झारखंडमधील काही केंद्रांवर NEET पेपर लीक झाल्याचे आरोप झाले होते. त्यावेळी मोठे आंदोलन, सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप आणि CBI चौकशी झाली होती. 

महत्त्वाचे: NTA ने विद्यार्थ्यांना केवळ अधिकृत वेबसाइट व सोशल मीडियावरील माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे आणि अफवांपासून सावध राहण्यास सांगितले आहे.