प्रभाग क्रमांक ५ मध्ये ड्रेनेजमिश्रित पिण्याचे पाणी; नागरिकांमध्ये संताप
छत्रपती संभाजीनगर:
छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील हेड पोस्ट ऑफिससमोरील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नळाद्वारे ड्रेनेजमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, दूषित पाण्यामुळे आजारांचा धोका वाढला आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच युवा नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शेख इस्माईल राजा यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्याला दूषित पाणी दाखवून तातडीने पाहणी करून ही समस्या नेमकी कुठून निर्माण होत आहे, याचा शोध घेण्याची मागणी केली. संबंधित कर्मचाऱ्यानेही पाण्याच्या समस्येची पाहणी करून कारण शोधले जाईल, असे सांगितल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शहर उपाध्यक्ष शेख इस्माईल राजा यांनी सांगितले.
दरम्यान, “हेड पोस्ट ऑफिससमोरील हा परिसर जणू वाऱ्यावर सोडलेला आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे जनप्रतिनिधी कोणतीही दखल घेत नसल्यामुळे या भागात समस्यांची बोंबाबोंब सुरू आहे,” असा आरोप शेख इस्माईल राजा यांनी केला.
पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळणे ही गंभीर बाब असून, महानगरपालिका प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा वाहिनीची तपासणी करून दूषित पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
"जनप्रतिनिधींनी या भागातील नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. इतकी वर्षे जनतेची कामे केली असतील तर आता नागरिकांच्या समस्या सोडवून दाखवा. येथील जनप्रतिनिधींनी आमच्याकडून बक्षीस घेऊन जावे,” असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शहर उपाध्यक्ष शेख इस्माईल राजा यांनी लगावला.







