अतिक्रमणाविरोधातील ऋषिकेश जैस्वाल यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित, प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन; हातगाड्या हटवण्याबाबत लवकरच निर्णय
छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज, सराफा रोड आणि गांधी पुतळा परिसरातील अनधिकृत हातगाड्या व अतिक्रमणाच्या प्रश्नावरून शिवसेनेचे नगरसेवक ऋषिकेश प्रदीप जैस्वाल हे शिवसेना स्टाईल आंदोलन करणार होते मात्र यांनी तात्पुरते ते स्थगित केले आहे.
या भागातील अतिक्रमणांमुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत जैस्वाल यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडे कारवाईची मागणी लावून धरली होती. तसेच हा परिसर नो हॉकर्स झोन घोषित करावा, अशीही त्यांची मागणी आहे. दरम्यान, या प्रश्नावर पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, महापौर आणि उपमहापौर यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनधिकृत हातगाड्यांवर लवकरच कारवाई करण्यात येईल तसेच रस्ता व्यापून टाकणाऱ्या हातगाड्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आंदोलन सध्या तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे ऋषिकेश जैस्वाल यांनी स्पष्ट केले. मात्र ठराविक कालावधीत कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक आक्रमक करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे
.









