साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिराती पुन्हा सुरू करण्यासाठी निवेदन

साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिराती पुन्हा सुरू करण्यासाठी निवेदन

“अचानक सहा महिन्यांपासून जाहिराती का बंद?” – अब्दुल कय्यूम

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी | दि. 25/02/2026

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून ऑगस्ट–सप्टेंबर 2025 पासून साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिराती देणे अचानकपणे बंद करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया (साप्ताहिक विंग)’तर्फे मा. विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून साप्ताहिकांना जाहिराती मिळत नसल्यामुळे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक साप्ताहिके आर्थिक अडचणीत सापडली आहेत. साप्ताहिक वृत्तपत्रे स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या, शासनाच्या योजना तसेच महानगरपालिकेचे विविध उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. जाहिरातींच्या उत्पन्नावरच अनेक साप्ताहिकांचा आर्थिक गाडा अवलंबून असतो.

यावेळी सैय्यद करीम, शेख इसाकोद्दीन, रमेश जाबा, मिर्झा शफीक बेग, हसन शाह, सैय्यद शब्बीर आदी उपस्थित होते. तसेच मनपा आयुक्त यांच्या पी.ए. यांनाही निवेदन देऊन त्यांच्या मार्फत आयुक्तांपर्यंत मागणी पोहोचविण्यात आली.

विरोधी पक्षनेते यांचे आश्वासन

समीर साजिद बिल्डर यांनी या विषयाची दखल घेत “साप्ताहिक वर्तमानपत्रांना जाहिराती का बंद करण्यात आल्या याची संबंधित प्रशासनाकडे चौकशी करून योग्य तो पाठपुरावा करणार,” असे आश्वासन दिले.

अब्दुल कय्यूम यांची प्रतिक्रिया

‘व्हॉईस ऑफ मीडिया (साप्ताहिक विंग)’चे प्रदेशाध्यक्ष अब्दुल कय्यूम म्हणाले, “महानगरपालिका यापूर्वी साप्ताहिकांना नियमित जाहिराती देत होती. मात्र सप्टेंबरपासून अचानक जाहिराती का बंद करण्यात आल्या, याचे कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. सहा महिन्यांपासून जाहिराती थांबविण्यामागचे कारण स्पष्ट न करणे हे अन्यायकारक आहे. त्यामुळे आम्ही आज मा. विरोधी पक्षनेते तसेच मनपा आयुक्तांच्या पी.ए. यांना निवेदन देऊन जाहिराती तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. जाहिरात वितरणात पारदर्शक, समतोल व न्याय्य धोरण राबविले जावे, ही आमची ठाम भूमिका आहे.”

महानगरपालिकेने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन साप्ताहिक वृत्तपत्रांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा पत्रकार व संबंधित घटकांकडून व्यक्त होत आहे.