अग्निशमन दलाच्या शूर जवानांचा सन्मान; पदमपुरा येथे सोहळा उत्साहात पार सर्वपक्षीय मुस्लिम आघाडी व नशा मुक्ती अभियानाचा उपक्रम.

अग्निशमन दलाच्या शूर जवानांचा सन्मान; पदमपुरा येथे सोहळा उत्साहात पार सर्वपक्षीय मुस्लिम आघाडी व नशा मुक्ती अभियानाचा उपक्रम.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध आगीच्या दुर्घटना व पूरस्थितीत जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा “सर्वपक्षीय मुस्लिम आघाडी व नशा मुक्ती अभियान” तर्फे पदमपुरा येथील मुख्य अग्निशमन केंद्रात सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

सोमवार, २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमात शहरातील सर्व अग्निशमन केंद्रांतील ऑन/ऑफ ड्युटीवरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन सर्व जवानांचा सत्कार करण्यात आला.

गेल्या काही काळात वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, पैठण तालुक्यांतील पूरस्थितीत अडकलेल्या 200 हून अधिक नागरिक व मुक्या जनावरांची सुखरूप सुटका, जालना रोडवरील एचपी गॅस टँकर लिकेज, नारेगाव येथील गोडाऊन आग, शहागंज परिसरातील कपड्यांच्या दुकानाला लागलेली आग तसेच महावीर घर संसार या दुकानातील भीषण आगीच्या घटनांमध्ये अग्निशमन दलाने दाखवलेले धाडस, तत्परता व कर्तव्यदक्षता याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

या सर्व घटनांमध्ये अग्निशमन दलाने स्वतःचा जीव धोक्यात घालून मोठी जीवित व वित्तहानी टाळली. त्यांच्या या कार्याबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कृतज्ञता व्यक्त केली.

साजिद मौलाना यांची प्रतिक्रिया :

संस्थापक अध्यक्ष साजिद मौलाना म्हणाले, “अग्निशमन दलाचे जवान हे समाजाचे खरे रक्षक आहेत. 2024 मध्ये जालना रोडवरील एचपी गॅस टँकर दुर्घटनेत मोठा अनर्थ टळला, तसेच नारेगाव व शहागंज परिसरातील आगीच्या घटनांमध्येही त्यांनी धाडसाने परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांच्या या शौर्याला सलाम करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. समाजाने अशा वीर जवानांच्या पाठीशी कायम उभे राहिले पाहिजे.”

अशोक खांडेकर (प्रमुख अग्निशमन अधिकारी) यांची प्रतिक्रिया :

अग्निशमन केंद्रप्रमुख अशोक खांडेकर यांनी सांगितले की, “अग्निशमन विभागात नुकत्याच 15 नवीन गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये दोन हायड्रोलिक गाड्यांचा समावेश असून त्या 36 मीटर (105 फूट) उंचीपर्यंत कार्य करू शकतात. शहरात एकूण पाच अग्निशमन केंद्रे कार्यरत असून मुख्य केंद्र पदमपुरा येथे आहे. कोणतीही आग किंवा आपत्कालीन घटना घडल्यास नागरिकांनी तात्काळ 101 या क्रमांकावर संपर्क साधावा. सर्वपक्षीय मुस्लिम आघाडी व नशा मुक्ती अभियान तर्फे पहिल्यांदाच आमचा सन्मान करण्यात आला असून त्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.”

या कार्यक्रमास शहरातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साजिद मौलाना, खालेद नाहदी चाऊस, राधाकिशन पंडित, शेख सलीम, अशोक पगारे, डॉ. शेख शकील, ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कय्यूम, राहुल शिरसाट, किशोर मस्के, भीमसेन कांबळे, सुधाकर चांदणे, युसूफ खान, सलीम शहा, बने खाँ पठाण तसेच माजी नगरसेवक फजलउल्लाह खान आदींनी परिश्रम घेतले.