रावसपुरा येथील जमीन बळकावून पेट्रोलपंप उभारला छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील छावणी पोलीस ठाण्याअंतर्गत मौजे रावसपुरा परिसरातील जमीन बळकावून बांधकाम आणि शासकीय परवानग्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर हेराफेरी करून त्यावर पेट्रोलपंप उभारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधितांनी फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, सरकारी यंत्रणेची दिशाभूल करणे व संगनमताने आर्थिक लाभ मिळवल्याचे समोर आले आहे.
तक्रारदार अब्दुल कादर सिद्दीकी (रा. लिंबगाव, जि. नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या भावाने सन २००९ मध्ये मौजे रावसपुरा परिसरातील गट क्रमांक १३/१ मधील जमीन खरेदी केली होती. संबंधित जमीन त्यांच्या ताब्यात असताना आरोपींनी विश्वास संपादन करून ती सांभाळण्याचे आश्वासन दिले. मात्र, २०२३ मध्ये प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या जागेवर पेट्रोलपंप सुरू असल्याचे उघड झाले.
फिर्यादीनुसार, जमीन मोजणीसाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवर तक्रारदाराच्या भावाची व भावजयच्या बनावट सह्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे या सह्या उर्दूमध्ये करण्यात आल्या असून संबंधित व्यक्ती प्रत्यक्षात इंग्रजीत सही करतात, असा दावा करण्यात आला आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन स्वतःची असल्याचे भासवून पेट्रोलपंपासाठी परवानगी मिळवली. तसेच भारत पेट्रोलियम (ँझ्ण्थ्) कंपनीसोबत करार करून पेट्रोलपंप भाड्याने देत आर्थिक फायदा लाटल्याचा आरोप केला आहे.
संबंधित पेट्रोलपंप मिर्झा नावाच्या व्यक्तीस भाड्याने देण्यात आला असून अब्दुल्लाखान यांनी आपल्या मुलगा मोहसीनखान व मिर्झा यांच्यासोबत भागीदारीत हा व्यवसाय सुरू केला. ‘महाराष्ट्र पेट्रोल पंप’ या नावाने हा पंप रावसपुरा–पडेगाव परिसरात सुरू आहे.
बांधकाम व परवानग्यांमध्ये गंभीर अनियमितता
या प्रकरणात केवळ जमीन बळकावण्यापुरतेच नव्हे, तर बांधकाम आणि शासकीय परवानग्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे उघड झाले आहे.
महानगरपालिकेकडून Completion Certificate घेतलेले नाही.
Occupancy Certificate (भोगवटा प्रमाणपत्र) न घेता पेट्रोलपंप सुरू.
अग्निशामक विभागाकडून केवळ तात्पुरती NOC ; कायमस्वरूपी NOC नाही.
मंजूर नकाशांपेक्षा प्रत्यक्ष बांधकाम वेगळे केल्याचे समोर.
शासकीय कार्यालयांना चुकीची माहिती देऊन परवानग्या मिळवल्या.
कायदेशीर कारवाईचे संकेत
मंजूर नकाशाच्या विरुद्ध बांधकाम केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ अंतर्गत कलम ४३, ५२, ५३ व ५४ नुसार कारवाई होऊ शकते. तसेच मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम २६३ नुसार भोगवटा प्रमाणपत्राशिवाय इमारतीचा वापर करणे बेकायदेशीर ठरते.
गुन्हे दाखल; तपास सुरू
या प्रकरणात अब्दुल्ला खान महेबुब खान, मोहसीन खान अब्दुल्ला खान ( रा. कोहिनूर कॉलनी) व इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत ३१८ (३), ३२९ (३), ३३६ (३), ३४० (२), ३ (५) अशा कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून बनावट कागदपत्रांचा वापर, आर्थिक व्यवहार व शासकीय परवानग्यांचा गैरवापराबाबत अधिक तपास छावणी पोलीस ठाण्याचे पो. नि. विवेक गणपत जाधव हे करीत आहेत.





