संवेदनशील राजकारणाचा कॉंग्रेसला विसर-हेमंत पाटील 'दादां'च्या निधनानंतर पोटनिवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित.
'दादां'च्या निधनानंतर पोटनिवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित
पुणे:अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतलेल्या सुनेत्रा पवार या जागेवरून महायुती तर्फे निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने मात्र, संवेदनशील राजकारणाचा कॉंग्रेसला विसर पडल्याचे दिसून येत आहे, असे मत भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी (ता.७) व्यक्त केले.
एखाद्या नेत्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांना पोटनिवडणुकीत प्राधान्य देत ही निवडणूक बिनविरोधात घेण्याची अलिखित प्रथा महाराष्ट्राची राहिली आहे. मात्र, बारामतीत कॉंग्रेसकडून आकाश मोरे यांना देण्यात आलेली उमेदवारी या राजकीय प्रथेचा भंग असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. दादांच्या अकाली निधनानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी महाराष्ट्राची इच्छा असल्याचे देखील पाटील म्हणाले.
लोकशाहीत सर्वांनाच निवडणूक लढवण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. मात्र, राज्यातील एका उपमुख्यमंत्र्याचे अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर सर्व पक्षांनी आपसी सहमतीने बिनविरोध निवडणूक होवू देणे एक संवेदनशील लोकशाहीचे प्रतीक आहे. कॉंग्रेसने उमेदवार दिल्याने मतदारसंघात चुरशीची लढत होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी या निवडणुकीत सुनेत्राताई भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होता. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं या निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. अशात राजकारणात भावनात्मकतेला दूर सारत काँग्रेस निवडणुकीत उतरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असल्याचे पाटील म्हणाले.





