पोट भरण्यासाठी काम घेतलं, 16 मजुरांना कंत्राटदारानं डांबलं, कर्नाटकातून पोलिसांनी केली सुटका.

पोट भरण्यासाठी काम घेतलं, 16 मजुरांना कंत्राटदारानं डांबलं, कर्नाटकातून पोलिसांनी केली सुटका.

जालना:-

पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो मैल दूर गेलेल्या ऊसतोड मजुरांच्या नशिबी मरणयातना आल्या होत्या. पण जालन्याच्या पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे कर्नाटकातील बिजापूर जिल्ह्यात डांबून ठेवलेल्या १६ मजुरांसह ४ लहान मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. कंत्राटदाराच्या तावडीतून सुटून हे मजूर पुन्हा आपल्या गावी पोहोचले असून, त्यांच्या डोळ्यांतील अश्रू आले.

नक्की काय घडलं होतं?

जालना जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या गावांतील १६ मजूर आपल्या लहान मुलांसह ऊस तोडणीसाठी कर्नाटकच्या बिजापूर जिल्ह्यात गेले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होतं, पण अचानक तिथल्या कंत्राटदाराने या मजुरांना डांबून ठेवलं. त्यांना घरी परत येऊ दिले जात नव्हते आणि त्यांच्यावर कडक पहारा ठेवण्यात आला होता. या मजुरांमध्ये ४ चिमुकल्यांचाही समावेश असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होती.

आपली माणसं परराज्यात संकटात आहेत, हे कळताच जालन्याच्या घनसावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. जालन्याचं एक विशेष पथक तातडीने बिजापूरकडे रवाना झालं. स्थानिक पोलिसांच्या मदतीने या मजुरांचा पत्ता शोधण्यात आला आणि कोणतीही इजा होऊ न देता त्यांची सुटका करण्यात आली.

कर्नाटकातील त्या नरकयातनांमधून सुटून जेव्हा हे मजूर आपल्या जालन्यात पोहोचले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा निःश्वास होता. पोटासाठी परराज्यात जाणं कसं जीवावर बेतू शकतं, याचा प्रत्यय या कुटुंबाला आला आहे. पोलिसांनी वेळीच हालचाल केली नसती तर या मजुरांचे काय झाले असते, या विचारानेच गावकऱ्यांच्या अंगावर काटा येत आहे.