बालविवाहाची शंका आल्यास तात्काळ कारवाई करा --- महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.

बालविवाहाची शंका आल्यास तात्काळ कारवाई करा  --- महिला व बालविकास राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर.

बालविवाह आढळल्यास तात्काळ 1098 किंवा 112 वर संपर्क करा

मुंबई - अक्षय तृतीया या शुभमुहूर्तावर राज्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळ्यांचे आयोजन होत असल्याने बालविवाह रोखण्यासाठी राज्य प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.

राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय बैठक व्हीसी द्वारे संपन्न झाली. सदर बैठकीस राज्याचे महिला व बालविकास आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत विविध यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील सर्व सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांना गावामध्ये होणाऱ्या विवाहांपूर्वी मुलगा व मुलगी यांच्या वयाची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः अक्षय तृतीयेच्या दिवशी होणाऱ्या विवाह सोहळ्यांवर लक्ष ठेवून बालविवाह होणार नाही यासाठी पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाला समन्वयाने काम करण्यास सांगितले आहे. तालुका व ग्रामस्तरावर विशेष पथके स्थापन करून देवस्थान, मंगल कार्यालये आणि इतर विवाहस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. बालविवाहाचे कोणतेही प्रकरण आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, पोलीस व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जिल्हानिहाय कृती आराखडे तयार केले जात आहेत. सर्व तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश आहेत. याशिवाय, विवाहाशी संबंधित सेवा देणारे जसे की मंगल कार्यालये, केटरर्स, प्रिंटिंग प्रेस, फोटोग्राफर, वाजंत्री तसेच धर्मगुरू यांनी मुलगा-मुलगी यांच्या वयाची खात्री केल्याशिवाय कोणतीही सेवा देऊ नये, अन्यथा त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होणार आहे. बालविवाहाविरोधात जनजागृती वाढवण्यासाठी गावोगावी दवंडी, पोस्टर मोहीम, विशेष ग्रामसभा, शाळांमध्ये पालक बैठक तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रचार केला जाणार आहे.

दरम्यान, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, बालविवाहासंदर्भातील कोणतीही माहिती चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा डायल 112 वर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. राज्यात बालविवाहास आळा घालण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या या मोहिमेला समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे आवाहन राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले आहे.