घाटी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर अन्यायाचा आरोप; ५ मे रोजी अनोखे आंदोलनाचा इशारा.
छत्रपती संभाजीनगरc – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर अन्याय-अत्याचार होत असल्याचा गंभीर आरोप करत प्रहार जनशक्ती पक्ष कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ५ मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळ्यात मडकं व पाठीला झाडू बांधून अनोखे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
संघटनेचे शहराध्यक्ष राजेंद्र पोहाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यावर मनमानी कारभार, बदलीची भीती आणि निलंबनाच्या धमक्या देण्याचे आरोप करण्यात आले आहेत.
यासोबतच लाड पागे समितीतील उमेदवारांच्या यादीत फेरफार झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मागील वर्षी अग्रक्रमावर असलेल्या उमेदवारांची नावे सध्याच्या यादीत मागे ढकलण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. महानगरपालिकेत ज्या पद्धतीने उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली, त्याच धर्तीवर घाटी रुग्णालयातील सुमारे 170 उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये 357 नवीन भरतीतील कर्मचाऱ्यांकडून जुने कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करून घेणे, लाड पागे समितीतील प्रलंबित उमेदवारांची भरती, जुन्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे, कर्मचारी निवासस्थानांची दुरुस्ती तसेच संबंधित सुरक्षा अधिकाऱ्याची बदली यांचा समावेश आहे.
कर्मचारी निवासस्थानांच्या दुरवस्थेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, दरवर्षी देखभालीसाठी निधी मिळूनही मागील तीन वर्षांत कोणतीही कामे न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तन होत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू उपस्थित राहणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.





