छत्रपती शिवाजी महाराजांच्या शहर भेटीचे ३६० वे वर्ष साजरे करणार
जयसिंगपुऱ्यात १५ मार्चला ‘हेरिटेज वॉक’ आणि अभिवादन
महानगरपालिका आणि इंटॅकचा संयुक्त उपक्रम
छत्रपती संभाजीनगर:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्कालीन औरंगाबाद शहर (आताचे छत्रपती संभाजीनगर) भेटीच्या ऐतिहासिक घटनेला यंदा ३६० वर्षे पूर्ण होत आहेत. या स्मृतींना उजाळा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इंटॅक (INTACH) यांच्या संयुक्त विद्यमाने १५ मार्च २०२६ रोजी जयसिंगपुरा परिसरात विशेष ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे.
इतिहासानुसार, पुरंदरच्या तहानंतर आग्र्याला जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगाबाद येथे मुक्काम केला होता. ५ मार्च १६६६ रोजी रायगडावरून आग्रा प्रवासासाठी निघालेले महाराज साधारण आठवडाभरात येथे पोहोचले होते. त्यांचा मुक्काम जयसिंगपुरा भागातील मिर्झाराजे जयसिंग यांच्या छावणीत होता. समकालीन नोंदींनुसार, महाराजांना पाहण्यासाठी त्या वेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आयोजित ‘हेरिटेज वॉक’ची सुरुवात १५ मार्च रोजी सकाळी ७ वाजता मकाई गेट येथून होईल. त्यानंतर जयसिंगपुरा परिसरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती देत हा वॉक पराक्रम गल्लीतील ऐतिहासिक श्री जयसिंह शिव मंदिर येथे समाप्त होईल. कार्यक्रम सकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहे.
या कार्यक्रमास महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, अनिल मकरिये , विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, इंटॅकचे राज्य समन्वयक व उद्योजक मुकुंद भोगले आणि ज्येष्ठ वास्तुविशारद माया वैद्य, इतिहासतज्ञ डॉ. दुलारी कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी आणि आदित्य वाघमारे हे सहभागी नागरिकांना जयसिंगपुरा परिसराचा इतिहास आणि शिवकालीन घडामोडींबाबत माहिती देणार आहेत. तसेच नादगंधर्व वाद्यपथकाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना संगीतमय अभिवादन करण्यात येणार आहे.
शहराच्या ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणाऱ्या या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिका पर्यटन विभाग उपायुक्त अंकुश पांढरे, सहायक आयुक्त ऋतुजा पाटील आणि इंटॅकचे सहसमन्वयक ॲड. स्वप्नील जोशी यांनी केले आहे.









