अल्पसंख्यांकांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी; राष्ट्रपती व राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाला निवेदन
छत्रपती संभाजीनगर
देशभरात अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाविरुद्ध वाढत असलेल्या द्वेषमूलक वातावरण, मॉब लिंचिंगच्या घटना, अवैध बुलडोजर कारवाई तसेच धार्मिक ओळखीच्या आधारावर होणाऱ्या कथित अत्याचारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) शहर जिल्हा उपाध्यक्ष अशरफ पठाण यांनी महामहिम राष्ट्रपती तसेच राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाला निवेदन सादर केले आहे.
हे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत पाठविण्यात आले. या निवेदनावर कय्युम शेख, सय्यद अझीम व मोहंमद हुसेन खान यांच्यासह अन्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या देखील आहेत.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारत हा लोकशाही व धर्मनिरपेक्ष देश असून भारतीय संविधानाच्या कलम 14, 15, 19, 21 आणि 25 अंतर्गत प्रत्येक नागरिकाला समानता, जीवनाचा अधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. मात्र सध्या देशातील काही भागांत अल्पसंख्यांक समाजाविरुद्ध द्वेष, हिंसा आणि भेदभावाच्या घटना वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच काही ठिकाणी मॉब लिंचिंग, अवैध बुलडोजर कारवाई व धार्मिक ओळख लक्षात घेऊन करण्यात येणाऱ्या कारवायांमुळे देशातील सामाजिक सलोखा व एकात्मतेला धक्का बसत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
अशरफ पठाण
याबाबत प्रतिक्रिया देताना अशरफ पठाण म्हणाले की, “भारताचे संविधान सर्व नागरिकांना समान अधिकार देते. कोणत्याही धर्म किंवा समाजाविरुद्ध अन्याय, हिंसा किंवा भेदभाव होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे केंद्र सरकारने व राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन सर्व राज्य सरकारांना कठोर कायदेशीर निर्देश द्यावेत, जेणेकरून अशा घटना तात्काळ थांबतील आणि दोषींवर कडक कारवाई होईल. देशात शांतता, बंधुता आणि सामाजिक सलोखा टिकवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.” असे त्यांनी स्पष्ट केले.









