गणेशोत्सवात स्वच्छतेचा जागर; मनपातर्फे ‘आमचा बाप्पा स्वच्छतेचा राजा’ अभिनव स्पर्धा

गणेशोत्सवात स्वच्छतेचा जागर; मनपातर्फे ‘आमचा बाप्पा स्वच्छतेचा राजा’ अभिनव स्पर्धा

महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन; यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष

छत्रपती संभाजीनगर, दि. १२ सप्टेंबर २०२६ :

महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनेही गणेशोत्सव अभिनव पद्धतीने साजरा करण्याचे नियोजन केले आहे. गणेशोत्सवानिमित्त मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे गणेशोत्सवदरम्यान स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.

   सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी मनपातर्फे ‘आमचा बाप्पा स्वच्छतेचा राजा’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, DJ मुक्त मिरवणूक, कचरापेटीची सुविधा, इको फ्रेंडली सजावट यांसह विविध प्रश्न विचारले जातील. त्यातील निवडक मंडळांची निवड करून त्यांना प्रथम, द्वितीय तृतीय आणि ७ उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील. मंडळांसाठी साऊंड सिस्टिम, सीसीटीव्ही कॅमेरा सेट, LED लाइट सेट यांसारखे बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.यंदा या स्पर्धेचे दुसरे वर्ष असून गतवर्षी शहरातील तब्बल २५० गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी उत्कृष्ट दहा मंडळांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. यंदाही शहरातील अधिकाधिक गणेश मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होऊन स्वच्छ आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात दररोज सायंकाळी शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या ठिकाणी आशीर्वाद बाप्पाचा जागर स्वच्छतेचा या उपक्रमातर्गत स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि कचरा वर्गीकरण या विषयांवर जनजागृती करणारे पथनाट्य तसेच बँड सादरीकरण करण्यात येणार आहे. 

गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा उत्सव न राहता तो स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उत्सव ठरावा, हा या सर्व उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.

‘आमचा बाप्पा स्वच्छतेचा राजा’ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना *क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन सहभाग नोंदविता येणार आहे.

शहरातील सर्व गणेश मंडळांनी यावर्षीही मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होऊन स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, तसेच मनपाच्या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर समीर राजूरकर, यांनी केले आहे.